सुपरमॅन का वेस्ट फ्रेंड

Published By: 
Dainik Gomantak
Dated On: 
20th January 2023
superman ka best friend

कोरोनाकाळातील बंदीवासात या एकांकिकेमधील कथेचा उगम आहे. घराबाहेर पडण्यास बंदी, अलगीकरण अशा स्थितीत एका बहूमजली इमारतीमधला मुलगा, गुडू, आपल्या फ्लॅटमधल्या बाल्कनीत बसून खेळत असतो. अचानक, बाहेर पलीकडे असणाऱ्या एका 'मित्रा' बरोबर त्याचे संभाषण सुरु होते आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या एका प्रचंड दरीची जाणीव त्याला होते.

तरीसुध्दा आपल्यामधला भेदभाव विसरुन ते बिनधास्तपणे आपसात गप्पा मारतात आणि त्यांच्या आकलनापलीकडे असलेल्या वेगळ्या जगाचा उलगडा करुन घ्यायचा प्रयत्न करतात. 'सुपरमॅन' का बेस्ट फ्रेंड' हे एक असे नाटक आहे, जे आपल्याला जाणीव करुन देते की मुले ही बाहेरच्या जगाची मूक साक्षीदार नसतात. त्यांचे बोल मात्र आपल्याला फार क्वचित ऐकू येतात. ही लघुनाटीका, मुले आणि प्रौढ या दोघासाठीही, 'विकास' या घटकासंबंधी आपला संवाद अधिक सखोल बनवण्याच्या आणि एका चांगल्या जगाची कल्पना करण्याच्या दृष्टीने अवकाश निर्माण करते.

कोरोनाकाळात, जेव्हा लाखो मजूर, शेकडो मैल दूर असणाऱ्या आपल्या गावी जायला पायी निघाले तेव्हा देशामधली मोठी शहरे कशी चूपचाप बसली होती त्याची आठवण हे नाटक करुन देते. या नाटकाबद्दल समीक्षक दिव्यानी रत्तनपाल लिहितात, 'या नाटकाचे लेखक- दिग्दर्शक अंजू उप्पल आणि प्रोबीर बोस यांनी अशी एक कथा मांडली आहे, जिचा उद्देश, समाजात असलेल्या उदासिनतेचा सामना आपण समंजसपणे करावा असा आहे. या नाटकामधला विनोद उत्तमपणे रचला गेला आहे. विशेषत गुडूचे 'आनलाईन' जीवन आणि त्याच्या मित्राचे गावातले जीवन यांची या नाटकातली मांडणी, 'डिजीटल इंडिया' संबंधी उपहासात्मक भाष्य करते.

आज जग पुन्हा सामान्य बनत जात असताना 'सुपरमॅन का बेस्ट फ्रेंड', कोरोनाकाळानंतरची एक कडू गोळी बनून येते आणि प्रेक्षकांसमोर काही प्रश्‍न उपस्थित करते.