त्याच्या गावचे रंग आकार

Published By: 
Dainik Gomantak
Dated On: 
14th March 2022
त्याच्या गावचे रंग आकार

मोहित नाईकने जरी चित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेतलेले नसले तरी आपले वडील, गोव्याचे नामवंत चित्रकार मोहन नाईक, हे आपली चित्रेरंगवताना, तिथे आसपास पसरून असलेल्या

रंगाशी त्याने लहानपणीच ओळख करून घेतली आहे. इझल, कॅनवास या त्याच्या परिचयाच्या विश्वातल्या गोष्टीआहेत.

मोहितने जरी 'बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन' या विषयात पदवी मिळवली असली (त्यानंतर त्याने 'एमबीए'ही पूर्ण केले) तरी फार पुर्वी रंग-रेषांशी जडलेले संबंध त्याला हाका घालतच होते. त्याची परिणती सहा महिन्यातच आपली नोकरी सोडण्यात आणि चित्रकलेच्या जगात उडी घेण्यात झाली. आता त्याच्या चित्रांचे पहिले स्वतंत्र प्रदर्शन, माजोर्डा येथील ‘कार्पे दिएम आर्ट गॅलरी’त 12 मार्चपासून सुरू झाले आहे. 'घोडके' हे मोहितचे गाव. लॉकडाऊनच्या दरम्यान आपल्या गावचे त्याने अधिक बारकाईने निरीक्षण केले. या निरीक्षणातून आपल्या चित्रांमधून मांडण्यासाठी त्याला अधिक सकसपणे आशय गवसत गेला. त्याच्या चित्रांमधले विषय जरी त्याच्या वडिलांच्या चित्रांशी मिळतेजुळते असले तरी आपली शैली भावी काळात अधिक विकसित होईल याबद्दल तो निश्चिंत आहे.

जलरंग आणि ऑइलमध्ये केलेल्या त्याच्या 50 पेक्षा अधिक चित्रात त्याने आधुनिक काळात फारशा प्रचलित नसलेल्या संकल्पनांना स्थान दिले आहे. आकर्षक रंग आणि काळ्या-पांढर् अर्ध-अमूर्त आकृत्यांमधून मोहित आपल्या गावाकडच्या गोष्टी सांगतो. प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन आणि बी. प्रभा हे मोहितचे आदर्श आहेत. भारतीय लघुचित्रे, अजिंठ्याची शिल्पे आणि वास्तू त्याला प्रेरणा देतात.

शाळेत असताना त्याने कॅन्व्हस रंगवले होते. रंगांच्या विविध माध्यमांतून प्रयोगही केले होते. शालेय स्तरावरच्या चित्रकला स्पर्धात बक्षिसे मिळवली होती. 2008 साली पणजीतल्या आणि 2011 साली चिंचणी गावच्या चित्रप्रदर्शनात भागही घेतला होता. त्यानंतर आता बऱ्याच वर्षांनी त्याच्याया स्वतंत्र चित्र प्रदर्शनाने चित्रकार म्हणून त्याच्या जीवनातले एक वर्तुळ पूर्णहोत आहे. प्रदर्शनातल्या त्याच्या चित्रांमधून अनेकांना आपल्या गावच्या खुणाही नक्कीच दिसून येतील.