ग्ढ शरीरे

Published By: 
Gomantak Marathi
Dated On: 
11th December 2021
ग्ढ शरीरे

कलेतला अभिव्यक्‍तीवाद (एक्सप्रेशनीजम) हा कलाकाराच्या अंतरातली वास्तवता बाहेरच्या जगात कलाकृतींकरवी मांडतो. वितेश नाईक आपल्या चित्रांमधून, आपल्यात वसलेल्या विविध मानवी व्यक्तिरेखामधल्या अंतरातली वास्तवता आपल्या रेषांमधून पकडण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो फिगरेटिव्ह शैलीचा उपयोग करतो.

“फिगरेशन' या शब्दाचा अर्थच आहे, बाह्यरेषा किंवा आकृती रचण्याची प्रक्रिया. एखाद्या गोष्टीचे, आकार आणि आकृतीमधून मांडलेले वैशिष्ट्य. चित्रकार वितेश नाईक यांनी फिगरेटिव्ह शैलीत रंगवलेल्या चित्रांचे प्रदर्शन“मिस्टिकल बोडी' ११ डिसेंबर ते ३१ जानेवारीपर्यंत माजोर्डा येथील 'कार्पे दिएम'मध्ये आयोजित होत आहे.

वितेश नाईक याना हल्लीच जगप्रसिद्ध 'पोलॉक क्रासनर फाउंडेशन ग्रँट' पुरस्कार प्राप्त झालेला आहे. वितेश आपल्या कलाकृतींमधून केवळ वस्तुनिष्ठ वास्तवाचे चित्रण करण्याचा प्रयत्न करत नाही तर तो सभोवतालच्या वस्तू किंवा घटना ज्या, एखाद्याच्या मनात प्रतिक्रिया किंवा भावना निर्माण करतात, त्यांचे चित्रण प्रतिक्रियांमधून किंवा त्यांच्या हावभावांवरून, रंगरेषांच्या सहाय्याने मांडण्याचा प्रयत्न करतो.

वितेशने 'गोवा कॉलेज ऑफ आर्ट'मधून आपला पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आतापर्यंत त्याने भारतातील सर्व प्रमुख शहरांमधून होणाऱ्या चित्रकला प्रदर्शनात आपली चित्रे मांडली आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार जिंकल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अत्यंत प्रतिष्ठित “पोलॉक क्रासनर फाउंडेशन ग्रँट' पुरस्कार त्याला लाभला आहे.

वितेशच्या चित्रांमधून त्याच्यावर असलेला पोर्तुगीज वसाहतीच्या वारसाचा, स्थानिक परंपरांचा, रीतिरिवाजांचा प्रभाव जाणवतो. चित्रांमधल्या ह्या प्रतिमा स्वतः चित्रकार वितेशच्या, विविध परिस्थितीतल्या मानसिक अवस्थांचा एक प्रकारचा आरसाच आहे. मानवी शरीराचा वापर करून पात्रे निर्माण करण्याच्या इच्छेने हा चित्रकार कायम पछाडलेला आहे. आपल्या कृतीना प्रतिकात्मकरित्या सुशोभित करून तो त्या शरीरांचे रूपांतर गूढ आणि जादुई व्यक्तींमध्ये करतो.